कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोड धंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे असली, तरी याचा आणखी एक फायदा होणार आहे. तो असा की, ग्रामीण भागातील शिक्षितच नव्हे, तर अशिक्षित महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल. आणि यातूनच महिला सबलीकरण होण्यास नक्कीच मदत होईल.

जेव्हा आपण एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र उभे करतो, तेव्हा त्यामध्ये ठराविक अशा महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे असते. जसे की, पर्यटकांची राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था असावी लागते. येथील राहणीमानाला आणि खाण्याला देखील ग्रामीण स्पर्श असावा लागतो. हे उत्तमरीत्या करू शकतात त्या महिलाच.

कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी पर्यटक शहरीभागातून येतात. शहरातले धकाधकीचे जीवन आणि जेवण दोनही गोष्टी त्यांना किमान काही काळ तरी नको असतात. त्यामुळे कृषी पर्यटनस्थळी मिळणारे जीवन आणि जेवण जेवढे जास्त नैसर्गिक आणि ग्रामीण स्पर्श असणारे असेल तेवढे त्यांना उत्तमच वाटते. यातूनच स्थानिक महिलांसाठी रोजगार निर्मिती होत असते. महिला स्वत: शेतातून भाजीपाला आणतात, स्वयंपाक बनवतात, कृषी पर्यटनाच्या ठिकाणचे अंगण शेणाने सारवून घेणे किंवा पाण्याचा सडा मारणे असेल, रांगोळी काढणे असेल, स्वच्छता ठेवणे असेल, पाणी भरणे असेल, पर्यटकांना शेतात नेऊन कशा प्रकारे काम करतात याचे प्रत्याक्षित दाखवणे असेल, अशी सर्व कामे त्या करू शकतात. शिवाय हेच काम करता करता त्या घरीही लक्ष देवू शकतात. कारण ही कामे बहुदा सकाळी आणि सायंकाळी असतात, त्यामुळे मधल्या वेळात त्या स्वत:ची कामे अथवा बचत गटात असतील तर बचत गटाची कामेदेखील करू शकतात.

येथील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक वस्तू स्वत:च्या हाताने बनवलेल्या असतात. अनेक खाद्य पदार्थ बनवलेली असतात. या वस्तू आणि हे खाद्य पदार्थ वेगळ्या धाटणीचे आणि विशिष्ट पद्धतीने बनवले असल्याने शहरातील लोक आवर्जून खरेदी करतील. यातून महिला बचत गटांना नक्कीच आर्थिक फायदा होवून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल.

या कामांमधून महिलांना आर्थिक मदत तर नक्कीच होईल; शिवाय शहरातून येणाऱ्या पर्यटकांमधील महिला पर्यटकांना बघून त्यांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होेईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, काम करणे किती गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाला हातभार लागतो. आणि आपल्याही आयुष्याला एक ध्येय प्राप्त होते, याची त्यांना जाणीव होईल. यातून त्याचे आणि कुटुंबियांचे देखील राहणीमान सुधारण्यास मदत होईल. विशेष म्हणजे आपल्या मुलांचे शिक्षण होणे किती गरजेचे आहे हे देखील त्यांच्या लक्षात येईल. अशाप्रकारे, कृषी पर्यटनातून मोठ्या संखेने महिला सबलीकरण होऊ शकेल. आणि शहरापेक्षा ग्रामीण जीवनच उत्तम असल्याची खात्री त्यांना पटल्याने ग्रामीण संस्कृती जोपासली जाईल याची नकळत खातरजमा होईल.

ज्योती बागल
jyotisbagal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *