कृषी पर्यटनाचा इतिहास

स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी पर्यटनाने जोर धरला. बॅक टू द रूट्स म्हणत, शेती म्हणजे काय, ती कशी असते, शेतकरी कसा काम करतो यासारख्या गोष्टींनी, शहरी पर्यटकांना आकर्षित करायला सुरुवात केली.

शेती, ग्रामीण जीवन आणि पर्यटन यांचा समन्वय म्हणजे कृषी पर्यटन. शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने कृषी पर्यटनाचा, एक पर्यटक, अभ्यासक, शेतकरी आणि सरकारी योजना यांच्या नजरेतून आढावा घेण्याचा एक प्रयत्न.

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, गारपीटं, वादळं, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे, शेती व शेतकी रोजगारांमध्ये घट होताना दिसून येत आहे. गतवर्षातील शेती व्यवसायातील झालेली घट (महादेश रिपोर्ट १७-१८) बघता येत्या काळात कृषी पर्यटन हा शेतकऱ्यासाठी पर्यायी उत्पन्न मिळवून देणारा मार्ग ठरेल. परिणामी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) गांभिर्याने विचार करून २०१६ च्या पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटनाचा विचार केलेला दिसतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *