कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण

Agro tourism is a place of study

             कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करते. कृषी पर्यटन केंद्र हा वेगाने वाढणारा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. शहरी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले लोक क्षणभर विरंगुळ्यासाठी कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. ग्रामीण शेती व शहरी पर्यटकांना जोडणारा हा व्यवसाय शिक्षण आणि करमणूक यांचा मिलाफ असून यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. कृषी पर्यटन हे केवळ फिरण्याचे ठिकाण नसून अभ्यासाचे केंद्र देखील आहे.

कृषी पर्यटन केंद्राच्या भिंतीवर रेखाटलेली वारली चित्रकला

गाव आणि गावपण’ हरवत चाललंय याची सल गाव तसेच शहरी लोकांच्याही मनात आहे. अलीकडे जागतिकीकरणामुळे ग्रामीण भागावरही शहरी संस्कृतीचा प्रभाव पडत आहे. मात्र कृषी पर्यटन केंद्रामध्ये संस्कृती, रीतीभाती, शेतशिवाराची ओळख जपली जात आहे. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यावरचे संवर्धन केले जात आहे, विविध जुन्या ग्रामीण शेतीविषयक वस्तू, स्थानिक कलाकुसर, लोककला यांची जपणूक होत आहे.

https://agrotourismvishwa.com/the-two-important-aspects-of-agro-tourism-are-agrieducation-and-agritainment/

पर्यटन केंद्राच्या निमित्ताने ‘अतिथी देवो भवं’ ही संस्कृती पर्यटकांना अनुभवायला मिळते. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुतारीच्या हे पारंपरिक वाद्य वाजवून तसेच औक्षण करून होते. त्यांना पूर्वीची कौलारू घरे, अंगण, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला, खानपान, परसबाग, बैलगाडी किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शिवारफेरी, विट्‌टी-दांडू, गोट्या, चकारी, गोफण यांसारखे ग्रामीण खेळ, स्थानिक लोककला यांसारख्या गोष्टींविषयी माहिती मिळते.

कृषी पर्यटन केंद्रात जतन केलेल्या ग्रामीण वस्तू – जाते, पाटा-वरवंटा, तुळशी वृंदावन, खलबत्ता, उखळ.

काही पर्यावरणप्रेमी पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी गावाकडे येतात त्यांच्यासाठी कृषी पर्यटन केंद्रात राहून पर्यावरणाचा अभ्यास करणे ही एक मोठी संधी आहे. आपल्याकडे विविध प्रकारची शेत व शेतकरी आहेत त्यामुळे कृषी पर्यटन केंद्रांमध्ये विविधता आहे. केंद्रामध्ये अनेक प्रकारची झाडे, भाज्या असतात. त्यामध्ये केवळ त्याच नैसर्गिक अधिवासात आढळणारी झाडे, औषधी वनस्पती, रानभाज्या आढळतात. पर्यावरण अभ्यासक तथा पर्यटकही यातील विविधतेचा अभ्यास करू शकतात. काही औषधी वनस्पती, रानभाज्या या फक्त ठराविक भागातच उगवतात. त्यांच्याविषयी माहिती व त्याचे उपयोग केवळ स्थानिकांना माहित असतात. या ज्ञानाचे संक्रमण होणे गरजेचे आहे. पर्यटन केंद्राच्या माध्यमातून त्यांचे संवर्धन व जपणूक होते. केंद्राकडून पर्यटकांना पिकांची लावणी, व्यवस्थापन, काढणी व वितरण बाबत माहिती तसेच प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. याशिवाय हरितगृह, रोपवाटिका, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळपिकांची लागवड, व्यवस्थापन, काढणी, प्रक्रिया व विपणनबाबत तसेच दुग्धव्यवसाय, पशूपालन, कुक्कुटपालन याबाबत माहिती व प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो.

कृषी पर्यटन केंद्रात भातलावणीचा अनुभव घेताना पर्यटक.

कृषी पर्यटन केंद्रात ग्रामीण खाद्यसंस्कृती जपली जाते. पर्यटकांना केंद्रावर स्थानिक व अस्सल गावरान पद्धतीचे जेवण उपलब्ध करून दिले जाते. तसेच पर्यटन केंद्रावर शेतीतील ताजा भाजीपाला, शेतीतील पदार्थांपासून बनवलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवलेली असतात. यामुळे पर्यटकांना सकस जेवण मिळतेच. याशिवाय पर्यटकांना ग्रामीण खाद्यसंस्कृती विषयक माहिती देखील मिळते.

https://agrotourismvishwa.com/the-difference-between-agri-tourism-and-resort/

पर्यटन केंद्रावर विविध ग्रामीण वस्तू ठेवलेल्या असतात उदा. उखळ, वरवंटा, खलबत्ता, पाटा, चूल. या कालबाह्य होत चाललेल्या वस्तूंचे जतन व संवर्धन कृषी केंद्रांच्या माध्यमातून होत आहे तसेच काही ग्रामीण वस्तू पर्यटकांना हाताळायलाही मिळत आहेत. उदा. सूत काढण्यासाठी चरखा, मडकं तयार करण्यासाठी फिरतं चाक. पूर्वीची लोक या साधनांच्या आधारे कसा आपला उदरनिर्वाह करत होते याविषयी पर्यटकांना माहिती मिळते.

 

कृषी पर्यटन केंद्रात मिळणारे अस्सल गावरान जेवण.

पूर्वी ग्रामीण व वनक्षेत्रात आदिवासी लोक रहायचे आता ते आजूबाजूच्या प्रदेशात विस्थापित झाले आहेत. त्यामुळे आदिवासी भागात त्यांची बोली भाषा, कला परंपरा लोप पावत आहे. आदिवासी लोक ओळखत असलेली वनसंपत्ती व त्या वनसंपत्तीची गरज, महत्व ,उपयोग कशासाठी होतो कोणते पीक केव्हा येते, त्याच्या उपयोग कधी करावा, याची माहिती फक्त या आदिवासी लोकांनाच आहे. या माहितीचे संक्रमण संवर्धन होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची मदत होते . यातून ग्रामीण भागात असलेल्या सर्वच अनमोल घटकांचे संरक्षण होते आणि पर्यटकांना वेगवेगळी माहिती मिळते. पर्यटक आनंदित होतात. तसेच त्या त्या गावाचे संस्कृतीचे जतन होते.

https://agrotourismvishwa.com/important-of-elements-of-agri-tourism/

याशिवाय कृषी पर्यटन केंद्रांवर शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केल्या जातात. त्यांनाही शेती, पर्यावरण, स्थानिक कला, ग्रामीण वस्तू, पशु-पक्षी , खेळ यांविषयी माहिती मिळते.

कृषी पर्यटन केंद्राच्या आसपास काही पर्यटन ठिकाण असतात. या पर्यटन ठिकाणांची सफर कृषी पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना घडवली जाते. यामुळे पर्यटकांना त्या भागाची माहिती, ठिकाणाची माहिती पर्यटकांना मिळते.

कृषी पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना जवळील पर्यटन ठिकाणांची सफर घडवली जाते.

कृषी पर्यटन केंद्रात भारुड, गोंधळ, जागरण, कीर्तन, वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ, लेझीम यांसारख्या लोककला पर्यटकांना मनोरंजनासाठी दाखवल्या जातात. यामुळे स्थानिक कलाकारांना रोजगार मिळतो शिवाय या कलांचेही संवर्धन होते आणि पर्यटकांनाही ग्रामीण लोककलांविषयी माहिती मिळते.

अशाप्रकारे ग्रामीण जीवन, कला, संस्कृती, पर्यावरण यांच्या माहितीचे भांडार असलेले पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी, अभ्यासकांसाठी , विद्यार्थ्यांसाठी कृषी मनोरंजनाबरोबरच एक अभ्यासाचे ठिकाण म्हणूनही उपयोगी पडते.

 

                                                                                                                                                  लेखिका : सुप्रिया थोरात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × five =