कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

Agro Tourism Center – Palashiwadi Baramati

बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन केंद्र सुरू केले आहे. प्रतिकुल परिस्थितीतही कृषी आणि पर्यटनाची योग्य सांगड कशी घालावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे पळशीवाडीतील ‘अग्रो टुरिझम केंद्र’. केंद्राचे संचालक पांडुरंग तावरे यांनी बी.सी.एस. मधून आपले शिक्षण पुर्ण केले व त्यानंतर पर्यटन क्षेत्रात 25 वर्ष काम केलं. या कामाच्या अनुभवातूनच कृषी पर्यटन केंद्र उभारले. 16 मे 2004 रोजी हे पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले. हे केवळ कृषी पर्यटन केंद्रच नाही, तर कृषी प्रशिक्षण केंद्रही आहे. 

पळशीवाडी केंद्रातील नयनरम्य दृश्य.


कृषी पर्यटन केंद्राविषयी – (Information of  Agro Tourism Center)

कल्पकतेने केलेली शेती कशी फायद्याची ठरू शकते हे या केंद्राच्या माध्यमातून समजतं. दुष्काळी भागात कमी पाण्यावर तग धरून राहतील अशा अनेक वृक्षांची लागवड या केंद्रात करून हे एक निसर्ग संपन्न केंद्र बनवलेलं आहे. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या आल्या आपल्याला एखाद्या वाड्यासमोर आल्यासारखं वाटतं. केंद्राच्या प्रवेशद्वाराची रचना ही पारंपरिक वाड्यासारखीच असून  प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यास विविधतेने नटलेली वृक्ष, वेली, फुले, पक्षी, विविधरंगी फुलपाखरे सजावट नजरेत भरते. परिसराची शांतता, पक्षांचा किलिबलाट एका वेगळ्याच जगात आल्याची अनुभूती करून देतात.

https://agrotourismvishwa.com/agro-tourism-is-a-place-of-study/ 

केंद्रातील ठिकाणे  (Places in the center )

1) कॉन्फरन्स हॉल  (Conference hall)

 या हॉलचा वापर प्रशिक्षणासाठी केंद्रात येणारे शेतकरी तसेच पर्यटक यांच्याशी संवाद साधण्यासाठी केला जातो. हॉलमधील पारंपरिक भारतीय वेशातील तसेच आरतीय ताट घेऊन असणाऱ्या महिलेची चित्रकृती लक्ष वेधून घेते. 

2) आंगण (Courtyard)

 मुख्य हॉल व राहण्याच्या खोल्या यांच्या आसपासच्या जागेत अंगण बनवलेलं आहे. यामध्ये तुळशी वृंदावन आहे. पक्षांना पाणी व दाणे देण्यासाठी एक ओटा बनवलेला आहे. अंगणात पारंपरिक वस्तूंची सजावट केलेली आहे. काही ठिकाणी रोपटीही गाडीच्या टायरमध्ये माती टाकून लावलेली आहेत. हा एक वेगळाच प्रयोग इथं केला गेला आहे. 

कृषी पर्यटन केंद्राचे अंगण.

3) राहण्याची व्यवस्था (Accommodation)

 एका वेळेस 100 पर्यटक राहू शकतील एवढी मोठी राहण्याची व्यवस्था आहे. केंद्रामध्ये एकूण 20 खोल्या तसेच दोन मोठे प्रशस्त हॉल आहेत. विशेष म्हणजे या हॉलमधील वस्तू सगळ्या ग्रामीण भागाप्रमाणे आहेत. राहण्याच्या खोलीमध्येच एक छोटासा बगीचा बनवलेला आहे. हॉल व राहण्याच्या खोल्यांमध्ये अनेक लहान-मोठे कंदिल लावलेले आहेत. या खोल्यांची आणखी एक विशेषता म्हणजे यातील विजेचे प्लग हेही जुन्या पध्दतीचे आहेत. 

केंद्रातील राहण्याची व्यवस्था.

4) शिवारफेरी (Shivarpheri)

पर्यटन केंद्राच्या आजूबाजूच्या शिवाराची, शेताची सफर पर्यटकांना घडवली जाते. 

5) सन रायझिंग पॉईंट (Sun Rising Point)

पर्यटन केंद्रातील शेतातून शिवारफेरीच्या वेळेस सकाळच्या अल्हाददायक वातावरणात उगवत्या सूर्याचे दर्शन अतिशय स्पष्टपणे करता येते. 

https://agrotourismvishwa.com/the-two-important-aspects-of-agro-tourism-are-agrieducation-and-agritainment/

6) शेत-तळे (Farm-ponds)

ओसाड माळरानावरील झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी 20 हजार कोटी लीटर क्षमता असलेलं शेततळं बांधण्यात आलेलं आहे. शहरात राहणाऱ्या लोकांना तारे दिसणं तसं दुर्मिळच. या पर्यटकांना तारे निरीक्षण करण्याची संधी तसेच रात्र काजव्यांचा अविष्कार पहायला मिळतो. पर्यटकांना भरपूर आदरातिथ्या बरोबरच गांधी टोपी देवून निरोप दिला जातो. 

केंद्राच्या संचालकांसोबत चर्चा करताना ॲग्रो टुरिझम विश्वचे सदस्य.

7) प्रशिक्षण केंद्र (Training Center)

 या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कृषी पर्यटन केंद्र नसून कृषी प्रशिक्षण केंद्रही आहे. रविवारी शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाविषयी प्रशिक्षण दिलं जातं. 2004 साली बारामतीपासून सुरू झालेली कृषी पर्यटनाची चळवळ देशभरात विस्तारली आहे. 

पर्यटकांची दिनचर्या  (Tourist routine)

सकाळी पर्यटकांना शिवारदर्शन घडवतात. यावेळी उगवत्या सूर्याचे दर्शन, पक्षी, वृक्ष निरीक्षणाची संधी पर्यटकांना मिळते. त्यानंतर पर्यटकांना शिवारातच नाष्टा दिला जातो. पर्यटकांना पोल्ट्री फार्म, गाईचा गोठा, दुध काढण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. परिसरात असणाऱ्या प्राचीन मंदिराचं दर्शन घडवलं जातं. दुपारची वेळ ही भोजन व विश्रांतीची असते. त्यानंतर साखर कारखान्याला भेट देवून साखर निर्मितीची प्रक्रिया दाखवली जाते. गावातील किंवा परिसरातील आठवडे बाजारही दाखवला जातो. सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना ग्रामीण खेळ शिकवले जातात. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर पर्यटकांसाठी मनोजरंजनाचे कार्यक्रम देखील ठेवले जातात. त्यात भारूड, गवळण, जागरण-गोंधळ यांचा सामावेश असतो. 

ग्रामीण वेशभूषा केलेले पर्यटक.

केंद्राचे उपक्रम (Center Activities)

1) ग्रामीण संस्कृतीच्या रिवाजाप्रमाणे पर्यटकांच्या स्वागतासाठी नक्षीदार रांगोळी रेखाटली जाते. त्यांचे स्वागत हे औक्षण करून केले जाते. त्यांना पर्यटन केंद्र परिसराच्या माहिती बरोबरच शेतात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभवही दिला जातो. तसेच त्यांना पेटिंग, कलाकुसरीच्या वस्तु बनवणे, विणकाम यांसारख्या कला शिकवल्या जातात. पर्यटकांना विविध खेळ शिकवले जातात. स्पर्धा आयोजित केल्या जातात. उदा. पतंग, भवरा, गोट्या, विटीदांडू, 
2) पर्यटकांना अस्सल महाराष्ट्रीयन पेहराव करायला दिला जातो. 
3)पर्यटकांना शिवारदर्शन, गोठा,पोल्ट्री, वायनरी, आठवडे बाजार, साखर कारखाना दाखवला जातो. बैलगाडी व ट्रॅक्टरमधून सफर घडवली जाते. 
4) पर्यटकांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, जुन्या परंपरा टिकवल्या जाव्यात म्हणून रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी स्थानिक कलाकारांच्या लोककला दाखवल्या जातात. 
5) रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवली जाते. गाणे आणि गप्पांची मैफल रंगते . शेकोटी भोवती विविध खेळ, कला शिकवल्या जातात. 

 सुप्रिया थोरात

thorat.supriya6@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =